'सतत नकार' हेच लग्न उशिरा जमण्याचे मुख्य कारण आहे.

Post Added : 19-Jul-2023
Source / Author : Yog Maratha
Post Viwed : 8,281 Times

आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या सुखाचा विचार जरूर करावा; पण तो करताना त्यांच्या वाढणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही असायला नको का?

कमी शिक्षण आहे? - नको ! पगार कमी आहे? - नको ! खेड्यात राहतो? - नको ! स्वतःचे घर नाही? - नको! घरात सासू-सासरे आहेत? - नको ! शेत नाही ?- नको ! शेती करतो ?- नको ! धंदा करतो ?- नको ! फार लांब राहतो?- नको ! काळा आहे? - नको ! टक्कल आहे ?- नको ! बुटका आहे? - नको ! फार उंच आहे ?- नको ! चष्मा आहे ?- नको ! वयात जास्त अंतर आहे? - नको ! तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही?- नको ! एक नाडी आहे ?- नको ! मंगळ आहे ?- नको ! नक्षत्र दोष आहे ? - नको ! मैत्रीदोष आहे ?- नको !- सगळ्यालाच नकार देत राहिलात तर मग लग्न कधी करणार? संसार कुणाबरोबर करणार ? आई,वडील कधी होणार ? सासू/सासरे कधी होणार? आजी/आजोबा कधी होणार ?.

- बरं एवढ्या सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट्यं असतात हे आई-वडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची, कुटुंब कसं बांधायचं हे माहीत नसतं! मुली हुशार आहेत, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार.. मग त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार...

या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... त्यांना लग्नासाठी मुली मिळणं मुश्कील झालं आहे. लग्नाच्या आधीच प्रत्येक गोष्ट नवऱ्या मुलाकडे असणं ही अपेक्षा अवाजवी आहे.अनेकांना मनापासून जोडीदार हवा असतो, पण मुलींच्या, त्यांच्या आई-वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या “उत्तम स्थळा”च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे मागे पडतात. मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा त्या मुलावर, त्याच्या कर्तृत्वावर विश्वास दाखवणं गरजेचं नाही का? मुलांनाही त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी उत्साह, उमेद, बळ हवं असतं, ते कोण देणार?

हल्ली लग्न म्हणजे मुला-मुलींपेक्षा त्यांच्या आई-वडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉलचा विषय झालेला आहे. माझा जावई डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, सीए वगैरे आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपण वाटतं आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आई-वडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो; पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्नं कशी होणार हा प्रश्नच आहे. लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदारपणाची जास्त गरज असते.

आई-वडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा; पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आई-वडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...

Return to Yog Maratha Blogs
yog maratha vadhu var kendra